अहिल्यानगर जिल्हा लिंगायत संघर्ष समितीच्या बैठकीत पदाधिकारी निवड
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
अहिल्यानगर जिल्हा लिंगायत संघर्ष समितीच्या बैठकीत पदाधिकारी निवड
कोपरगाव : अहिल्यानगर जिल्हा लिंगायत संघर्ष समिती व कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील लिंगायत संघर्ष समिती पदाधिकारी व समाज बांधव यांची बैठक समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये लिंगायत समाजाचे लोकनेते ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
लिंगायत संघर्ष समितीच्या संघर्षातून महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या १४ पोट जातींना आरक्षण मिळालेले आहे. महाराष्ट्रात लिंगायत संघर्ष समितीची ताकद वाढविण्यासाठी संघटनेतील तरुण, युवा पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने जबाबदारी पार पाडावी. – प्रदीप साखरे, युवा अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा लिंगायत संघर्ष समिती.
या बैठकीत अहिल्यानगर जिल्हा लिंगायत संघर्ष समिती जिल्हा कार्यकारणी मध्ये श्रीरामपूर येथील युवा कार्यकर्ते विशाल निकाडे यांची कार्याध्यक्षपदी तर राहाता तालुक्यातील युवा नेतृत्व अमोल झळके यांची जिल्हा कार्यकारणीवर उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
विशाल निकाडे हे गेल्या १० वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून श्रीरामपूर तालुक्यातील लिंगायत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांचा सुरेश जनरल स्टोअर्स व रामकमल एंटरप्राइजेस या फर्मच्या माध्यमातून देखील सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा असतो.
लिंगायत समाजाचे लोकनेते काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन लिंगायत संघर्ष समितीचे संघटन मजबूत केले आहे. काका लिंगायत समाजाचे विविध प्रश्न संघटनेच्या माध्यमातून राज्य, केंद्र सरकारकडे मांडत असतात. संघटनेची ताकद वाढावी यासाठी काका देखील महाराष्ट्रभर फिरत असतात. निवड झालेल्या तरुण, युवा पदाधिकाऱ्यांनी संघटनेसाठी काम करून समाजाच्या प्रगतीला बळ द्यावे. – गोपीनाथ निळकंठ, जेष्ठ पदाधिकारी, अहिल्यानगर जिल्हा लिंगायत संघर्ष समिती.
राहाता तालुक्यातील अमोल झळके हे व्यापारी असून त्यांचे शिवम सेल्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स नावाचे फर्म आहे. शिवगर्जना मंडळाच्या माध्यमातून गेल्या २१ वर्षापासून सामाजिक कार्याला त्यांनी वाहून घेतले आहे. राहाता तालुक्यातील लिंगायत समाजातील बांधवांना एकत्र करून महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन प्रत्येक वर्षी करत असतात. तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
या वेळी श्रीरामपूर येथील वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे खजिनदार किशोर सोसे व पदाधिकारी दिनेश वाडनकर, शिर्डी महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे, एस जी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय विरकर, गोपीनाथ निळकंठ, गिरीश सोनेकर, मधुकर झळके, प्रकाश वाळेकर, अनिल जंगम, विलास वाळेकर, विकासआप्पा चेनुके, साखरे सर, लोहारकर सर, तांदळे, लिंगायत महिला मंडळ अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे, सौ.मंगल साखरे, अमोल राजूरकर, अमोल साखरे, सतीश निळकंठ आदींसह अहिल्यानगर जिल्ह्य लिंगायत संघर्ष समिती पदाधिकारी, कोपरगाव वीरशैव महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदीप साखरे यांनी मानले.