धुमाळ काकांचा एक रुपया माजी सैनिकांसाठी…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
धुमाळ काकांचा एक रुपया माजी सैनिकांसाठी…
धुमाळ काकांच्या हातगाडी वरील सुविचार
कोपरगाव : अशोक धुमाळ हे कोपरगाव शहरात वडा पाव, ब्रेड वडा, मुंग भजी, पुणेरी आप्पे हे खाद्य पदार्था विक्रीचा व्यवसाय करतात. दररोज प्रत्येक खाद्यपदार्थ विकल्यानंतर त्या विक्रीतील १ रुपया माजी सैनिकासाठी त्यांच्या हात गाडीवर असलेल्या बॉक्समध्ये टाकतात. प्रत्येक महिन्याला त्या बॉक्समध्ये जमा होणारी रक्कम माजी सैनिकांच्या एक्स आर्मी असोसिएशन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे दान स्वरूपात सुपूर्द करतात. त्यांच्या हातगाडीवर सामाजिक प्रबोधन करणारे वेग वेगळे सुविचार लिहिलेले असून त्या सुविचारांच्या माध्यमातूनही ते समाज प्रबोधन करत असतात. अशोक धुमाळ यांचे हे काम कौतुकास पात्र असून समस्त कोपरगावकरांनी यांच्या हात गाडीवर येऊन खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. असे आवाहन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
जीवनात माणुसकी सर्वात महत्त्वाची आहे. पैसा, प्रतिष्ठा, पद हे सगळे काही नसते. माझ्या कामातून मला समाधान मिळते. आज माणुसकी पुन्हा एकदा काकांच्या रूपाने अनुभवली. काकांसारखे माणुसकीवर प्रेम करणारे लोक समाजात आहेत. त्यामुळे माणुसकी जिवंत आहे. समता परिवार व एक्स आर्मी असोसिएशन या माजी सैनिकांच्या संघटनेने मला केलेल्या मदतीमुळे मी जे सामाजिक कार्य करतो त्या कार्याला उभारी मिळाली आहे – अशोक धुमाळ, वडा पाव विक्रेते
धुमाळ यांनी ऑक्टोबर महिन्यात एक – एक रुपया दानपेटीत टाकून जमा केलेल्या रक्कमेचा बॉक्स एक्स आर्मी असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे यांच्याकडे समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
प्रसंगी अशोक धुमाळ यांचा काही दिवसांपूर्वी अपघातात पाय फ्रॅक्चर झाला होता. पाय फ्रॅक्चर झाला तरी ते हात गाडीवर येऊन हाताला जमेल ते काम करायचे. जगा वेगळे सामाजिक काम करणारे अवलिया अशोक धुमाळ यांच्या व्यवसायातून त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी राहून सहकार्य करणारी समता नागरी सहकारी पतसंस्था व एक्स आर्मी असोसिएशनच्या वतीने त्यांचा दवाखान्याच्या खर्चासाठी अशोक धुमाळ व त्यांच्या धर्मपत्नी सौ.मंगल धुमाळ यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
या वेळी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, एक्स आर्मी असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुती कोपरे, खजिनदार पंकज झावरे, सचिव सुभाष क्षिरसागर, गोपीनाथ गांगुर्डे, मार्गदर्शक इनामके साहेब आदीसह नागरिक उपस्थित होते.