समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
कोपरगाव : शिव जयंती म्हणजे शिवरायांच्या कला-गुणांना आठवण्याचा दिवस आहे.खरा शिवभक्त हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातुन तयार होत असतो.ते जन्मापासून मृत्यूपर्यंत शिकत होते त्यामुळे त्यांनी असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवली. त्यांच्याप्रमाणे त्यांचे विचार,कला,गुण आत्मसात करून स्वतःचे ध्येय साध्य केले पाहिजे.ते साध्य करण्यासाठी स्वतःला विसरता आले पाहिजे.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यातील गुरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे श्री रामदास खैरे यांनी केले.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दत्तात्रय जगताप व श्री रामदास खैरे आणि मुंबादेवी तरुण मंडळाचे श्री सुनील फंड,लाठी-काठी प्रशिक्षक श्री लतीफ शेख यांच्या शुभ हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते तर मुंबादेवी देवी तरुण मंडळाचे ढोल-ताशा प्रशिक्षक गोपाळ वैरागळ,श्री वाल्मिक गोसावी,डॉ.दीपाली आचार्य,समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे,शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन यांनी करून दिला तर त्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगाला माहिती असणारा इतिहास आहे.१९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात शिवजन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. समतातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास,त्यांनी केलेल्या लढाया,त्यांचे विचार अंगिकारून यश संपादन करावे.अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली.
या प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिव जन्म उत्सव,स्वराज्याची शपथ, शिवराज्याभिषेक सोहळा यांसारख्या नाटिका सादर करत शिवाजी महाराजांवर आधारित गीतांवर नृत्ये सादर केली.नाटिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेला उत्कृष्ट अभिनय हा अंगावर शहारे आणणारा होता. तसेच मुंबादेवी तरुण मंडळाचे लाठी-काठी प्रशिक्षक श्री लतीफ शेख व त्यांच्या विद्यार्थ्यांनी समताच्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. विविध कला सादर केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते भेटवस्तू देऊन खाऊंचे वाटप करण्यात आले.समताचे विद्यार्थी आदिश आचार्य,विश्वजित शिंदे,आराध्या कामटकर,रूद्र राठोड यांनीही लाठी-काठी कला सादर केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.६वी तील विद्यार्थिनी ओवी जपे आणि इ.८वी तील विद्यार्थिनी अनुष्का ठोळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता स्कूलचे उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ सीमा जाधव यांनी मानले.