जागतिक स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
जागतिक स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलचे आर्यन कुमार, अन्वी उंबरकर, आणि इशिका सहानी या विद्यार्थ्यांनी साई मॉडेल युनायटेड नेशन्स २०२४ (SAIMUN) आयोजित जागतिक स्पर्धेत प्रतिभा आणि मुत्सद्देगिरीचे प्रभावी प्रदर्शन करत चमकदार कामगिरी केली आहे. ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे पार पडलेल्या या जागतिक स्पर्धेचा प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या ‘उत्कृष्ट प्रतिभावान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य समीर अत्तार, शिक्षिका जेलीस शाद, जिज्ञासा कुलकर्णी, परविन शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
समता इंटरनॅशनल स्कूलच्या या तीन विद्यार्थ्यांचा सन्मान साई मॉडेल युनायटेड नेशन्स (SAIMUN) चे राष्ट्रीय माहिती जनसंपर्क अधिकारी चंद्रमौली गुहा यांच्या हस्ते या वेळी करण्यात आला. या स्पर्धेचे स्वरूप जगभरातील बाल वयातील प्रतिभावान विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे असून त्यांच्यातील सुप्त गुण विकसित करणारे होते. या जागतिक स्पर्धेत झिम्बाब्वे, बांगलादेश, कतार, मलावी, यु.ए.ई, दक्षिण सुदान, युगांडा आणि श्रीलंका यांसारख्या देशातील शाळांसह जगभरातील २१ शाळांमधील १ हजार प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची कामगिरी ही हिऱ्यासारखी चमकणारी होती. या जागतिक स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १६ विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थ्यानी केलेल्या चमकदार, उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांचे स्पर्धेतील हे यश त्यांचे कठोर परिश्रम, समर्पण आणि साई मॉडेल युनायटेड नेशन्सच्या क्षेत्रातील उत्कृष्ट क्षमतांचा पुरावा आहे.
जागतिक पातळीवर केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदीप कोयटे, कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे, प्राचार्य डॉ.विनोदचंद्र शर्मा, पालक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.