समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऊर्जा 2.O या मेगा स्पोर्ट उपक्रमाचा जल्लोष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऊर्जा 2.O या मेगा स्पोर्ट उपक्रमाचा जल्लोष

कोपरगाव : विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ऊर्जा 2.O’ या मेगा स्पोर्ट्स उपक्रमाचे आयोजन समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि येवले नगरीतील प्रसिद्ध युवा उद्योजक सम्राट वर्मा, सौ.हिमांशी सम्राट वर्मा, वैजनाथ लोणगावकर, मंगल लोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक प्रात्यक्षिकातून ऊर्जेचा जल्लोष अनुभवायला मिळाला.

प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ड्रोनच्या सहाय्याने समता इंटरनॅशनल स्कूलचा ध्वजाचे ध्वजारोहण आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली घोडेस्वारी व शिस्तबद्ध परेड कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. अचूक रचना, काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध पावले पाहून उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली.

“आत्मविश्वास, धैर्य व सुसंस्कृतपणा यांचा संगम कला आणि हस्तकला, विविध क्रीडा प्रकार, शैक्षणिक मूल्यांच्या माध्यमातून साकारलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावरील हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रथमच पाहायला मिळाला असल्याची प्रतिक्रिया उपस्थित पालकांनी व्यक्त केली.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी केले. त्या म्हणाल्या की, समता इंटरनॅशनल स्कूल फक्त पुस्तकी अभ्यासक्रमासाठी मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारी तत्पर शिक्षण संस्था आहे. त्यामुळेच समता सीबीएसई अंतर्गत होणाऱ्या बोर्ड परीक्षेत तसेच राज्य,जिल्हा तालुका स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील विविध क्रीडा प्रकारात देखील झळकते. समताचे नवनवीन उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित असून समता विद्यार्थ्यांची ध्येय व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. स्वतःचे उज्वल भविष्य घडविणारे विद्यार्थी समता घडवत आहेत.

मार्च पासनंतर सादर केलेली झांकी व बाईक रॅली कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.सामाजिक संदेश व राष्ट्रप्रेम अधोरेखित करणाऱ्या झांक्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले, तर बाईक रॅलीतील नियंत्रण, समन्वय आणि आत्मविश्वासामुळे मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला होता.

यानंतर मान्यवरांचा सत्कार व विविध क्रीडा तसेच सहशालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. नंतर सादर झालेली गणेश वंदना, ऑलिम्पिक खेळाडूंना मानवंदना, रिंग ड्रिल, बांबू ड्रिल व क्लॉथ ड्रिलमधील अचूकता व सौंदर्याने कार्यक्रमाची उंची वाढवली.

तसेच सोशल मीडिया, मोबाईलच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांमध्ये मैदानी स्पर्धांमधील सहभागाचे प्रमाण लक्षात घेता समताने कलरीपयट्टू, योगा, रिबन डान्स, चेस डान्स, ड्रम बीट, लेझीम, फुटबॉल मॅच, एरियल सिल, एरोबिक्स, लाठी-काठी व मल्लखांब या साहसी क्रीडा प्रकाराचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. जिम्नॅस्टिक्स व राष्ट्रीय प्रतीक नृत्याने राष्ट्रभावना जागवली, तर ग्रँड फिनालेने कार्यक्रमाचा भव्य समारोप झाला.

समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांनी अध्यक्षीय मनोगतातून शिक्षणासोबत क्रीडा व शारीरिक विकासालाही तितकेच महत्त्व देण्याची गरज असल्याचे सांगत एकूणच ‘ऊर्जा 2.O’ हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धांचा भाग न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी देणारा आहे. शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला हा उपक्रम दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानत प्राचार्य समीर अत्तार यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यांनी खेळ हे शिस्त, संघ भावना व नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.या वेळी समता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल, संचालक गिरीश सोनेकर, निरव रावलिया, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अरविंद पटेल, संदीप कोयटे, अक्षरा पटेल, श्वेता अजमेरा, भरत अजमेरा, सिमरन खुबानी आदींसह कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पीआय संजय कोळी, राहता न्यायालयाचे न्यायाधीश सैफुद्दीन शेख, कोपरगाव न्यायालयाचे न्यायाधीश युनूस तांबोळी, शिर्डी नगर परिषद नगरसेवक अमित शेळके, वैजापूर नगरपरिषद नगरसेवक विनोद राजपूत, शिर्डी विमानतळ डेप्युटी कमांडंट अमित कुमार या पालकांसह विद्यार्थी, पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.



