देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

काका कोयटे यांच्या नेतृत्वाचा बहुआयामी गौरव

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

काका कोयटे यांच्या नेतृत्वाचा बहुआयामी गौरव

पुणे : सातारा येथील गुंफण अकादमी आणि पुणे जिल्हयातील कोथरूड येथील भारतीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलन जे. पी. नाईक शिक्षण संस्था आणि विकास केंद्राच्या संकुलात पार पडले. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांना निवृत्त मुख्य न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते ‘गुंफण सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेंगे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत प्रमुख पाहुणे व सत्कारार्थी काका कोयटे यांचे स्वागत व परिचय करून दिला. तसेच काका कोयटे यांच्या नेतृत्वामुळे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार चळवळीचा गौरव अधिक वृद्धिंगत झाल्याची भावना देखील या वेळी व्यक्त केली.

काका कोयटे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून राज्यातील सुमारे १६ हजार नागरी सहकारी पतसंस्थांचे नेतृत्व त्यांनी सक्षमपणे सांभाळले आहे. पतसंस्थांच्या बळकटीसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, संघटनात्मक एकजूट आणि शासकीय स्तरावर पाठपुरावा या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या पुढाकारातून सहकार संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारून पतसंस्थांसाठी लेखा परीक्षण, व्यवस्थापन व वसुली विषयक नियमित प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच ते अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जवळपास चार दशके चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. एक लाखांहून अधिक सभासद संख्या आणि हजारो कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठत संस्थेला राज्यातील अग्रगण्य पतसंस्थांमध्ये स्थान मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पारदर्शक कारभार, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि सभासद केंद्री धोरणे ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही काका कोयटे यांची उल्लेखनीय भूमिका आहे. ते Association of Asian Confederation of Credit Unions (ACCU) या आशियातील ३६ देशांतील सहकारी पतसंस्थांच्या संघटनेवर भारताचे प्रतिनिधित्व करत असून, २०२१ पासून ट्रेझरर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या माध्यमातून त्यांनी थायलंड, मलेशिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया, कोरिया, नेपाळ आणि श्रीलंका येथील पतसंस्थांच्या कार्य पद्धतीचा अभ्यास करून भारतीय सहकार क्षेत्राला जागतिक दृष्टी दिली आहे.

या वेळी व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुनंदा शेळके, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. महादेव सगरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय बोरुडे, ज्येष्ठ ग्रामीण कथाकार बबन पोतदार, भोगावती कारखान्याचे संचालक बी. ए. पाटील, भारतीय शिक्षण संस्थेचे सदस्य सचिव डॉ. जयसिंग कळके, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजीत शेख यांनी केले, तर आभार स्वाती बाजारे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे