समताज सहकार मिनी मॉल मध्ये ना नफा,ना तोटा या तत्त्वावर तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध – सौ.सुहासिनी कोयटे, अध्यक्षा
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताज सहकार मिनी मॉलमध्ये ना नफा,ना तोटा या तत्त्वावर तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध – सौ सुहासिनी कोयटे,अध्यक्षा.
कोपरगाव :भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात राबविण्यात येत असून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित समता महिला बचत गट देखील या उपक्रमात सहभागी होत असून ‘ना नफा,ना तोटा’ या तत्त्वावर कोपरगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना तिरंगा ध्वज समताज सहकार मिनी मॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहोत. तिरंगा ध्वज तयार करण्यासाठी समता महिला बचत गटातील २५ महिला रात्रं-दिवस मेहनत घेत असून १० हजार तिरंगा ध्वज तयार करणार आहे.समता महिला बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या या तिरंग्याची किंमत फक्त २५ रुपये आहे. कोपरगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी अतिशय कमी दरात समताज सहकार मिनी मॉलमध्ये उपलब्ध असलेल्या तिरंगा ध्वज घेऊन १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान तालुक्यातील प्रत्येक घरोघरी तिरंगा ध्वज फडकवून या उपक्रमात सहभागी व्हावे.असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी केले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, घरोघर लावलेल्या तिरंगा ध्वजांचा गैरवापर होऊ नये, त्यासाठी ते तिरंगा ध्वज पुन्हा समता पतसंस्थेत देण्यासाठी ०८०६९१६५५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.संपर्क केल्यानंतर समता पतसंस्थेचे कर्मचारी आणि समता स्कूलचे विद्यार्थी घरोघरी जाऊन गोळा करणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना त्यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना कायम स्वरूपी प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात राहावी या उद्देशाने केंद्र शासनाने या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.