ब्रेकिंगमहाराष्ट्र

काका कोयटे यांचा तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

काका कोयटे यांचा कोपरगाव तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, समता चॅरिटेबल ट्रस्ट, व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन, या माझ्या मूळ संस्था असून या संस्थांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पदावरून सहकार चळवळीला बळकट करण्याचे काम करत आहे त्यातूनच परदेशी दौरे करून नवनवीन तंत्रज्ञान भारतातील पतसंस्थामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. कार्याची दखल घेऊन बँकॉक येथे झालेल्या आशियाई पतसंस्था फेडरेशन (ॲक्यु) च्या ४१ व्या जनरल बैठकीत लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन संचालक म्हणून माझी निवड झाली तर बहुमताने खजिनदार पदी निवड करण्यात आली.या पेक्षा ही माझ्यासाठी मी भारत देशाचे प्रतिनिधित्व केले ही सर्वात अभिमानाची गोष्ट होती.असे मत आशियाई पतसंस्था फेडरेशन (ॲक्यु) वर संचालक व बहुमताने खजिनदारपदी निवड झालेले ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले. विविध संघटनांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी ते बोलत होते.

तसेच ते पुढे म्हणाले की परदेशातील पतसंस्था व त्यांचे फेडरेशन भक्कम अशा आर्थिक पायावर उभी आहे परंतु भारतात इतके प्रगत तंत्रज्ञान अद्याप कोणत्याही देशात नाही बँकिंग क्षेत्रातील भारताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान जगभर नेण्यासाठी तसेच जगभरातील पतसंस्थांची कार्यपद्धती भारतात बुजवण्यासाठी मी या पदाचा वापर करणार आहे.

या निवडी प्रसंगी बोलताना कोरिया देशाचे प्रतिनिधित्व करणारे व ॲक्युचे नूतन अध्यक्ष किम युनसिक म्हणाले की, भारतातील समता नागरी सहकारी पतसंस्थेची अत्याधुनिक तंत्र प्रणाली व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून पाहिल्यानंतर समता पतसंस्था वापरत असलेल्या तंत्रज्ञानाने आम्ही प्रभावित झालो आहोत. हे समताचे तंत्रज्ञान काका कोयटे यांनी इतर देशांनाही द्यावे व जगभरातील सहकारी पतसंस्था चळवळ प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्न करावा.

ॲक्युसारख्या जागतिक संस्थेवर भारताच्या प्रतिनिधीला संचालक होण्याची संधी आज पर्यंत मिळाली नव्हती. ही संधी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता परिवाराचे संस्थापक, अध्यक्ष काका कोयटे यांच्या माध्यमातून मिळाली हा कोपरगावकरांसाठी सन्मान असल्याचे प्रतिपादन व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा यांनी केले.

आशिया खंडातील ३६ देशांचे प्रतिनिधित्व आणि ७ कोटींच्या वर सभासद असलेल्या सहकारी चळवळीचे नेतृत्व एशियन कॉन्फडेरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यु) ही संस्था करते.या संस्थेची थायलंड देशातील बँकॉक या ठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशन (ॲक्यु) वर संचालक म्हणून तर बहुमताने खजिनदार पदी निवड झाली.कोरिया देशातील किम योन्सिक यांची अध्यक्षपदी निवड झाली.या बैठकीला ३६ देशातील प्रतिनिधी उपस्थित होते. सहकार क्षेत्रात त्यांचे ३६ वर्षाचे असलेले योगदान आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून १४ वर्षे त्यांनी स्वीकारलेल्या अध्यक्षपदावरून परदेशी अभ्यास दौरे करून महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करत आहे.या बैठकीत ३६ देशातील प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावत विक्रमी मताधिक्याने काका कोयटे यांना निवडून दिले.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष आणि समता परिवाराचे संस्थापक,अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा समता परिवार, समता नागरी सहकारी कर्मचारी पतसंस्था, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ,कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन,लायन्स क्लब ऑफ कोपरगाव,लिओ क्लब ऑफ कोपरगाव आदींसह विविध स्तरावरील संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक श्री.रविंद्र पाठक मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, काका कोयटे यांनी माझ्यासारख्या तडीपार माणसाला नवीन जीवन जगण्याची संधी दिली. अशा अनेक कार्यकर्त्यांना प्रगती पथावर नेले आहे. यामुळे ते सहकार क्षेत्रात उंच उंच शिखरे गाठीत आहेत.

किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सुधीर डागा, दि पिपल को-ऑप. बँकेचे अध्यक्ष श्री.सत्येन मुंदडा, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे माजी अध्यक्ष श्री.राम थोरे, श्री. नितीन शिंदे, श्री रवींद्र पाठक, समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री.अरविंद पटेल, मुख्य कार्यालयाचे अधिकारी श्रीमती उज्वला बोरावके, श्री.जनार्दन कदम, श्री.महेश भावसार आदींनी मनोगते व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभाला कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री.परेश उदावंत,श्री.किरण शिरोडे श्री.भीमजी भाई पटेल,श्री राजेंद्र शिरोडे,नितीन भुसारे, लिओ क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष श्री.सुमित सिनगर श्री.विजयराव जाधव, समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री.गुलाबचंद अग्रवाल, श्री.चांगदेव शिरोडे, श्री.अरविंद पटेल,श्री.रामचंद्र बागरेचा श्री.संदीप कोयटे,श्री.गुलशन होडे,श्री.कचरू मोकळ,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड, मुख्य कार्यालयातील अधिकारी, कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री.आप्पा कोल्हे, श्री.फारुक शेख, कर्मचारी, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सत्कार समारंभाचे सुत्रसंचालन ठेव विभाग प्रमुख श्री. संजय पारखे यांनी केले. उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे