समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून गोदापात्रात स्वच्छता अभियान यशस्वी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याकडून गोदापात्रात स्वच्छता अभियान यशस्वी
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त भारतीय समाजसेवक, विख्यात पर्यावरण तज्ञ, जल पुरुष श्री. राजेंद्र सिंह राणा यांनी मागील वर्षी समता इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट दिली होती. त्यांच्या प्रेरणेने जल प्रदूषण कमी करून जल संरक्षण आणि जल बचाव व्हावा. यासाठी कोपरगाव शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जल प्रदूषण विषयक जागृती करत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोदावरी स्वच्छता अभियान यशस्वी केले.
बदलत्या वातावरणामुळे जल प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे आपले नैसर्गिक जल स्रोत धोक्यात येत आहे. या सर्वांसाठी मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण व्हावी. तसेच त्यांना परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटावे, सामाजिक जबाबदारीचे भान यावे. या उद्देशाने समता इंटरनॅशनल स्कूल आणि कोपरगाव शहरातील गोदामाई प्रतिष्ठान यांच्यावतीने गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. प्रसंगी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.आदिनाथ ढाकणे परिवार आणि सहकाऱ्यांसह आठवड्यातील एक दिवस गोदावरी नदी पात्रातील स्वच्छतेचे अभियान राबवत असतात. त्या बद्दल समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी ढाकणे म्हणाले की, शालेय जीवनात स्वच्छता अभियानाचे धडे गिरवले, तर भविष्यात समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी हे स्वच्छतादूत बनतील आणि कोपरगाव शहरातील गोदावरी नदी बरोबरच इतर नद्यांच्या स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतील.
या वेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे घोष वाक्याचे फलक घेऊन फेरी काढली होती. त्या नंतर नदीकाठ व परिसराची स्वच्छता केली. या स्वच्छता अभियानात समता इंटरनॅशनल स्कूलच्या इ.८ वी व इ.९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोदावरी नदी पात्रात केलेली स्वच्छता आणि पर्यावरण विषयक जागृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा, उपप्राचार्य श्री.समीर अत्तार, विभाग प्रमुख श्रीमती विभावरी नगरकर, श्री.आकाश मिश्रा आदिंसह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत अनमोल मार्गदर्शन केले. तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.आदिनाथ ढाकणे आणि परिसरातील नागरिकांचे ही सहकार्य लाभले.
या यशस्वी स्वच्छता अभियानाचे आणि विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.