हळदी – कुंकू सौभाग्याचं लेणं – सुहासिनी कोयटे, माजी नगराध्यक्षा
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

हळदी – कुंकू सौभाग्याचं लेणं – सौ. सुहासिनी कोयटे, माजी नगराध्यक्षा
कोपरगाव : मकर संक्रांत या सणाला भारतीय संस्कृतीमध्ये महिलांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण स्थान आहे. या निमित्ताने अनेक महिला एकत्र येऊन विचार , संस्कृतीची देवाण-घेवाण करत असतात हळदी – कुंकू हा उपक्रम प्रत्येक जाती धर्मात आयोजित करून महिलांना वाण म्हणून संसार उपयोगी वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. या उपक्रमाला सौभाग्याचं लेणं म्हणूनही ओळखले जात असल्याचे समता महिला बचत गट अध्यक्षा व कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त गावच्या लोक नियुक्त प्रथम महिला सरपंच सौ.देवयानी प्रशांत घुले यांच्या अध्यक्षतेखाली राघवेश्वर मंदिरातील सभा मंडपात हळदी – कुंकूवाचा कार्यक्रम पार पडला. प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला कुंभारी गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
त्या पुढे म्हणाल्या की, घरात आईने मुलावर सकारात्मक संस्कार करून भविष्यात आपली मुलं ही कर्तबगार बनवू शकतात. त्यासाठी घरातही मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग सुरू करावा. समता महिला बचत गट गावातील महिलांच्या बचत गट व लघुउद्योगांना वेळो वेळी सहकार्य करेल.
तसेच डॉ.संकेत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत बी.पी, शुगर, एच.बी तपासणी शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. डॉ.संकेत पोटे यांनी महिलांना विविध आजारांविषयी, त्यावरील उपचारांविषयी प्राथमिक माहिती देत, हिमोग्लोबिन व रक्तपुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक उपायांची सविस्तर माहिती दिली. तपासणीसाठी आरोग्य सेविका सुशिला वाघ, आरोग्य कर्मचारी ताराबाई चिने यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ.ज्योती पवार यांनी मनोगतातून महिलांमध्ये असणाऱ्या विविध गुणांचे वर्णन करून, महिला विविध नाती विविध पात्रांच्या माध्यमातून साकार करत असताना येणाऱ्या अडी – अडचणींवर मात करून एक महिला एका कुटुंबाला सुखी व आनंदी ठेवत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते भगवान राधा – कृष्ण व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. महिलांना हळदी – कुंकू देऊन वाण म्हणून गुळाच्या भेलीचे वाटप करून अल्पोपहार देण्यात आला. तसेच उपस्थित एकल महिलांचाही सन्मान करून त्यांना हळदी – कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
प्रमुख पाहुण्या सौ.सुहासिनी कोयटे यांचा सन्मान करून सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुंभारी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.देवयानी घुले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जेष्ठ महिला यमुनाबाई बढे, वीर माता आशा जाधव, राजेश्वर मंदिरात सेवा देणाऱ्या मीरा व हिरा महाजन, शीला पैठणी हरिपाठाच्या माध्यमातून मुलांवर धार्मिक संस्कार करणाऱ्या सौ.संगीता भारती, डॉ. संकेत पोटे, आरोग्य सेविका संगीता शिंदे, ताराबाई चिने आदींचाही सत्कार श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी सायली निळकंठ व निशा महाजन यांनी केले. या वेळी कुंभारी ग्रामपंचायत सदस्य कविता निळकंठ, मनीषा घुले, गं.भा.रंजनाबाई गायकवाड, श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव योगिता पैठणी व गावातील १५० च्या वर महिला उपस्थित होत्या. उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्या मनीषा घुले यांनी मानले.