“समता पतसंस्था सुरक्षित असल्याचा सभासदांचा विश्वास” हास्य-विनोद, मार्गदर्शन आणि आनंदाच्या जल्लोषात समता सभासद स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

मनमाड येथे संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली
“समता पतसंस्था सुरक्षित असल्याचा सभासदांचा विश्वास”
येवला येथे संस्थेचे सभासद व चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करताना
हास्य-विनोद, मार्गदर्शन आणि आनंदाच्या जल्लोषात समता सभासद स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
येवला, मनमाड : समता नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने येवला येथील श्री मुरलीधर मंदिर, टिळक मैदान तसेच मनमाड येथील शिवचंद्र बँक्वेट हॉल मध्ये सभासद स्नेहमेळावा आणि जेष्ठ नागरिकांसाठी ‘हसत खेळत तणावमुक्ती’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी सभासद, ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हास्य-विनोद, मार्गदर्शन आणि आनंदाच्या वातावरणामुळे दोन्ही कार्यक्रमांना विशेष रंगत आली.
समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी उपस्थित सभासदांशी संवाद साधत संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला. पतसंस्थेची भक्कम आर्थिक स्थिती, सभासद व ठेवीदारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच समता उद्यान, निराधारांना भोजन, अनाथांसाठी आश्रय, आरोग्य मंदिर, योग भवन, समता इंटरनॅशनल स्कूल आणि समता अभ्यास मंदिर यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
येवला येथील कार्यक्रमाला सभासद हितचिंतक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल यांनी समता पतसंस्थेच्या पारदर्शक कारभाराची माहिती देत सभासदांचा विश्वास कायम राखण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने दक्ष असल्याचे सांगितले. संस्थेच्या कारभारात कोणत्याही गैरप्रकाराला वाव मिळू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेची आर्थिक व प्रशासकीय व्यवस्था सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर उपस्थित सभासदांनीही समता ही सुरक्षित व विश्वासार्ह पतसंस्था असल्याचा विश्वास व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक आनंदी, सकारात्मक आणि तणावमुक्त व्हावे, या उद्देशाने आयोजित ‘हसत खेळत तणावमुक्ती’ या व्याख्यानातून सुप्रसिद्ध व्याख्याते अशोक देशमुख यांनी आपल्या मिश्कील व संवादात्मक शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील ताणतणावांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, आनंदी राहणे आणि प्रसन्न जीवनशैली अंगीकारणे याबाबत त्यांनी विविध उदाहरणे व विनोदांच्या माध्यमातून संदेश दिला. त्यांच्या विनोदी शैलीने उपस्थितांना अक्षरशः खळखळून हसवले.

व्याख्यानादरम्यान वाढलेला उत्साह पुढे आनंदाच्या जल्लोषात परिवर्तित झाला. महिला-पुरुष सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आनंद व्यक्त केला. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमस्थळी हास्य, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी येवला येथे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, मनमाड येथे मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, भागिनाथ सोनार, प्रकाश गवळी, अल्ताफ बाबा खान, संस्थेचे जेष्ठ संचालक जितुभाई शहा, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, सौ.सुहासिनी कोयटे, सौ.ज्योत्स्ना पटेल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद, ज्येष्ठ नागरिक, महिला, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला सभासद, हितचिंतकांचा उस्फूर्त प्रतिसाद.
सभासद स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांशी थेट संवाद साधल्याने सभासद आणि संस्थेतील नाते अधिक दृढ झाले. विश्वास, पारदर्शकता, सामाजिक बांधिलकी, प्रबोधन आणि हास्य-विनोदाची मनमुराद उधळण यामुळे येवला व मनमाड येथील कार्यक्रम अविस्मरणीय ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच येवला शाखाधिकारी विनय बाकळे, मनमाड शाखाधिकारी आतिश गवळी व शाखेतील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सभासद व नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल व्हा.चेअरमन अरविंद पटेल यांनी आभार मानले.



