देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

“बस चालक हे पालकांनी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाची जबाबदारी” – प्रकाश गवळी

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

“बस चालक हे पालकांनी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाची जबाबदारी” – प्रकाश गवळी

कोपरगाव : “ज्याप्रमाणे आपले आई – वडील आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतात, त्याचप्रमाणे हे वाहनचालक दररोज आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतात. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत आणणे आणि सुखरूप घरी पोहोचविणे ही केवळ त्यांची नोकरी नसून पालकांनी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य चालक – मालक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केले.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या संकल्पनेतून चालक दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ५० बसचालकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्षस्थानी होते.

कोपरगाव तालुका ट्रक ड्रायव्हर-मालक वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अय्युबभाई कच्ची, सचिव शैलेशशेठ रावल, वाहनचालक संघाचे मार्गदर्शक व सल्लागार सागर कस्तुरे, संचालक पांडुरंग राजे, स्कूलच्या उपप्राचार्या मोहिनी जगताप उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना घरातून शाळेत आणणे आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारी बसचालक पार पाडतात. त्यांच्या या सेवेमागील कर्तव्य भावनेची जाणीव ठेवत विद्यार्थ्यांनी चालक दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि चालकांविषयीचा आदर दिसून आला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले, “आम्ही वाहनचालकांकडे केवळ कर्मचारी म्हणून पाहत नाही, तर त्यांना आमच्या कुटुंबातील सदस्य मानतो. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक चालक अत्यंत निष्ठेने समता परिवाराची सेवा करत आहेत. काही सहकारी तर तब्बल ३० वर्षांपासून आमच्यासोबत कार्यरत आहेत. त्यांच्या हातात केवळ वाहनाचे स्टेअरिंग नसते; त्यांच्या हाती विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि पालकांच्या विश्वासाची अमूल्य जबाबदारी असते.”

प्राचार्य समीर अत्तार यांनी वाहनचालकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना त्याला योग्य दिशा दिली, त्याचप्रमाणे आपल्या वाहनचालकांच्या हातात विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी आहे. ते केवळ वाहन चालवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे सारथी म्हणून कार्य करतात.”

विद्यार्थ्यांनी चालक दिनानिमित्त आपल्या बसचालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात चालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासोबतच पालकांचा विश्वास जपण्याचे काम करणाऱ्या चालकांविषयी आदर व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमामुळे चालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शालेय सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, देखभाल व दुरुस्ती विभाग, कार्यालयीन विभाग आणि वाहतूक विभाग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेताली सदाफळ यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे