सेवाभावातून समताची सामाजिक बांधिलकी; शिक्षण, आरोग्य अन् ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


सेवाभावातून समताची सामाजिक बांधिलकी; शिक्षण, आरोग्य अन् ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम
नेवासा : आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे जाऊन समाजाच्या गरजा ओळखत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मुख्य कार्यालय असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, गरजू रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधा तसेच सभासदांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांतून संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे.

नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने समता पतसंस्थेच्या सौजन्याने वॉटर फिल्टर मशीनचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमासोबतच गरजू रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी २ व्हीलचेअर, २ वॉकर, २ काठ्या आणि १ बेड चे ही लोकार्पण करण्यात आले.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचा संदेश देण्यासाठी ‘हसत खेळत तणावमुक्ती’ या विषयावर विशेष व्याख्यान व सभासद स्नेहमेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले. प्रसिद्ध व्याख्याते अशोक देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. याच उपक्रमांतर्गत आज श्रीरामपूर आणि नेवासा शाखेतही अशोक देशमुख यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनातील ताणतणाव कमी करण्याबरोबरच हास्य, सकारात्मक विचार आणि आनंदी जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ सभासदांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या शुभहस्ते आणि संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांच्या मार्गदर्शनाखाली हे विविध उपक्रम संपन्न झाले. आर्थिक क्षेत्रातील कार्यासोबतच समाजहिताच्या उपक्रमांना सातत्याने प्राधान्य देत समता पतसंस्थेने सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेवासा येथे नेवासा शाखेचे शाखाधिकारी अमोल दिवटे व श्रीरामपूर येथे शाखेच्या शाखाधिकारी सौ. पद्मिनी पारखे, अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



