गुजरातच्या १२० सहकार प्रतिनिधींची समता मुख्यालयाला सदिच्छा भेट; अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांची घेतली माहिती
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

गुजरातमधील सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी समता मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.अक्षरा अनुप पटेल यांनी गुजराती भाषेत समताचा प्रेरणादायी प्रवास चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना समजावून सांगितला.

गुजरातच्या १२० सहकार प्रतिनिधींची समता मुख्यालयाला सदिच्छा भेट; अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांची घेतली माहिती
कोपरगाव : गुजरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष डॉ.जीवराजभाई गोधानी, संचालक अल्पेश धामेलिया, सीईओ दुष्यनसिंह वाघेला, सुरत जिल्हा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी फेडरेशन एम.डी. रमेशभाई लाठीया, संचालक मंडळ आणि गुजरातमधील विविध सहकारी पतसंस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक आदींसह १२० प्रतिनिधींनी २२ ऑगस्ट २०२६ रोजी समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. प्रसंगी जेठालाल पटेल, अशोकशेठ जानी यांनी कोपरगाव गुजराती मित्रमंडळाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या आत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा, आधुनिक बँकिंग प्रणाली आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती प्रतिनिधींना देण्यात आली.


गुजरातमधून आलेल्या प्रतिनिधींना संस्थेच्या कार्याची माहिती त्यांच्या भाषेत समजावी, यासाठी समता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल व संचालिका सौ.अक्षरा अनुप पटेल यांनी चित्रफितीच्या माध्यमातून गुजराती भाषेत विविध सेवा व उपक्रमांचे सादरीकरण केले. गुजराती भाषेतून समता विषयी परिपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संचालिका सौ अक्षरा अनुप पटेल यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो, याचा परिचय या माध्यमातून करून देण्यात आला.


समता पतसंस्थेने विकसित केलेल्या सेल्फ बँकिंग, व्हाउचरलेस बँकिंग, ऑडिट कंट्रोल रूम, ऑनलाइन समता रिकव्हरी पॅटर्न, पेपरलेस बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या सुविधांची माहिती प्रतिनिधींना देण्यात आली. व्यवहारांमध्ये अचूकता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी या प्रणालींचा उपयोग केला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.


संस्थेच्या ऑडिट कंट्रोल रूमच्या माध्यमातून कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची पद्धत, तसेच ऑनलाइन प्रणालीद्वारे कर्जवसुलीचे व्यवस्थापन याबाबतही माहिती देण्यात आली. सोनेतारण कर्ज वितरण प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सविस्तर माहिती संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, निलेश देशमाने, कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी सविस्तर दिली.


संस्थेच्या विविध सुविधा व उपक्रमांबरोबरच तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांना एक हक्काचे केंद्र उपलब्ध करून दिलेले ‘सहकार उद्योग मंदिर’ आणि ‘समता सहकार मिनी मॉल’ ची संकल्पना व कार्य याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

गुजरातमधील १२० प्रतिनिधींनी समता पतसंस्थेच्या विविध तंत्रज्ञानावर आधारित सुविधांची माहिती घेतली. या शिष्टमंडळात ४० महिला प्रतिनिधी होत्या. त्यांनी संचालिका अक्षरा पटेल यांनी केलेल्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. विशेषतः व्हाउचरलेस बँकिंग, पेपरलेस बँकिंग, ऑडिट कंट्रोल रूम, ऑनलाइन रिकव्हरी पॅटर्न, मोबाईल बँकिंग आणि सोनेतारण कर्ज वितरण प्रक्रिया याबाबत प्रतिनिधींनी उत्सुकता दाखविली. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विकसित केलेल्या विविध सुविधा आणि उपक्रम प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी या भेटीमुळे गुजरातमधील प्रतिनिधींना मिळाली.

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये सहकाराची भक्कम परंपरा असून, अशा सदिच्छा भेटींमधून सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती आणि अनुभवांची देवाणघेवाण होण्यास मदत होते. समता पतसंस्थेच्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा आणि विविध उपक्रमांचा परिचय गुजरातमधील सहकार प्रतिनिधींना या भेटीतून झाला.

यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक जितूभाई शहा, कचरू मोकळ, अश्विन व्यास यांच्यासह मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



