निवाऱ्यातील समाज सुधारक स्तंभावर अहिल्याबाई होळकरांच्या तैलचित्राचे अनावरण
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
निवाऱ्यातील समाज सुधारक स्तंभावर अहिल्याबाई होळकरांच्या तैलचित्राचे अनावरण
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोपरगाव शहरातील निवारा परिसरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रय खेमनर आणि धनगर समाजाचे नेते व वारी गावचे माजी सरपंच प्रकाशराव करडे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
तसेच महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीतील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. कोपरगाव शहरातील दत्ताच्या पारावर अहिल्याबाई होळकर यांनी घाट बांधला होता. समता पतसंस्थेचे उपक्रम कौतुकास्पद असून निवारा परिसरातील हा स्तंभ सर्वांना प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रय खेमनर यांनी सांगितले.
धनगर सेवा संघाचे राज्य सचिव रमेश टिक्कल म्हणाले की, समता चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्था विविध योजना व उपक्रमांमध्ये महत्वपूर्ण योगदान देत आहे. आर्थिक क्षेत्रातही उत्तुंग झेप घेतली असून समता इंटरनॅशनल स्कूल, व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन, समता महिला बचत गट या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे समता पतसंस्था आर्थिक व्यवहारांबरोबरच सामाजिक दायित्वातून माणुसकी जपणारी पतसंस्था आहे.
वारी गावचे माजी सरपंच प्रकाशराव करडे यांनी मनोगतातून अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. या उपक्रमाचे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संचालक मंडळ आदींनी कौतुक करत अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. निवारा परिसरातील साई निवारा मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.
या वेळी धनगर सेवा संघाचे राज्य सचिव रमेश टिक्कल, ज्ञानेश्वर कोळपे, रावसाहेब करडे, भाऊसाहेब करडे, पांडुरंग करडे, अशोक मतकर, भाऊसाहेब बडे, रामदास आदमने, विठ्ठलराव मैदड, साई निवारा मित्र मंडळाचे अध्यक्ष जनार्दन कदम, सदस्य, समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार समता पतसंस्था कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले.