वीरशैव लिंगायत समाजाचा अभिमान शशिकांत गुळवे ; एक सामान्य कामगार ते डायरेक्टर पदाचा प्रेरणादायी प्रवास !
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

वीरशैव लिंगायत समाजाचा अभिमान शशिकांत गुळवे ; एक सामान्य कामगार ते डायरेक्टर पदाचा प्रेरणादायी प्रवास !
अहिल्यानगर – “जिथे जिद्द आणि चिकाटी असते तिथे यशाला अटळता असते,” हे विधान सार्थ ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे वीरशैव लिंगायत समाजाचे सुपुत्र शशिकांत गुळवे. एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या प्रामाणिक मेहनतीच्या आणि ध्येय वेड्या स्वभावाच्या जोरावर त्यांनी कामगार ते डायरेक्टर पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पार केला आहे.
शशिकांतजींचे बालपण नगरच्या अहिल्यानगर भागात गेले. त्यांचे वडील शिवाजी साउंड या नावाने प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिकल डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम व्यवसायात कार्यरत होते. बालवयातच त्यांनी वडिलांच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली. शिस्त, वक्तशीरपणा, निटनेटकेपणा ही मूल्ये त्यांनी वडिलांकडूनच आत्मसात केली.
शिक्षणासोबतच काम करत त्यांनी स्वतःला घडवले. एल अॅन्ड टी (L&T) सारख्या नामवंत कंपनीत त्यांनी कामगार म्हणून सुरुवात केली आणि अल्पावधीतच आपल्या नेतृत्व गुणांमुळे भारतीय कामगार सेनेचे युनियन लिडर बनले. कामगार हक्कांसाठी लढताना त्यांनी व्यवस्थापनासोबत समन्वय साधत अनेक वेतन वाढीचे करार यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांनी MPM (पर्सनल मॅनेजमेंट) व LLB चे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या ज्ञानात सातत्याने भर घातली.
नवीन काही करण्याच्या उर्मीने त्यांनी L&T मधील स्थिर नोकरीचा राजीनामा देऊन दमानिया ॲग्रीटेक हॅचरीजमध्ये लेबर ऑफिसर म्हणून जबाबदारी स्वीकारली. तिथेही आपल्या प्रामाणिक व प्रभावी कामगिरीने कंपनीचा विश्वास संपादन केला. पुढे १९९६ मध्ये त्यांना कायनेटिक इंजिनियरिंग या नगरमधील प्रसिद्ध कंपनीत पर्सनल ऑफिसर म्हणून संधी मिळाली.
कायनेटिकमध्ये रुजू होताच त्यांनी दोन युनियनमधील वाद, कामगार कपात, कंपनीतील तणावपूर्ण परिस्थिती या सर्वांचा यशस्वीपणे सामना केला. VRS योजनेद्वारे ४०० कामगारांना लाभ देत त्यांनी व्यवस्थापन व कामगार यांच्यातील समतोल साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे कंपनीत शांतीचं वातावरण निर्माण झालं. त्यांनी ४५००, ८८००, १३५०० अशा तीन महत्वपूर्ण वेतनवाढीचे करार केले.
त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन कायनेटिक इंजिनियरिंगचे व्हॉईस चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अजिंक्य फिरोदिया यांनी त्यांना कंपनीच्या डायरेक्टर बॉडी मध्ये “Director” या पदावर नियुक्त केले.
शशिकांत गुळवे यांचा प्रवास समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा. त्यांनी ज्या कठीण परिस्थितीतून ही यशाची शिखरे गाठली, ती आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकते. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाला अभिमान वाटावा, असे हे व्यक्तिमत्व नक्कीच आहे.
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया) व लिंगायत संघर्ष समिती या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून शशिकांत गुळवे नेहमी कार्यरत राहिलेले आहेत त्यांच्या या यशाबद्दल व्हायाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे आणि लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष सुनील रूकारी यांनी गुळवे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.