जानेवारीत बुलढाण्यात चार राज्यांतील पतसंस्थांचे भव्य अधिवेशन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

जानेवारीत बुलढाण्यात चार राज्यांतील पतसंस्थांचे भव्य अधिवेशन

काका कोयटे, राधेश्यामजी चांडक आणि अण्णासाहेब जोले यांच्या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा
कोपरगाव : सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी आणि पतसंस्था क्षेत्राच्या विविध प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी जानेवारी महिन्यात बुलढाणा येथे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा या चार राज्यांतील पतसंस्थांचे भव्य अधिवेशन आयोजित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. केंद्रीय सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घेण्याचे प्रस्तावित असून, या माध्यमातून पतसंस्था क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चार राज्यांतील पतसंस्थांना एकत्र आणणारे हे अधिवेशन सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी, पतसंस्थांच्या प्रश्नांच्या प्रभावी मांडणीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे – काका कोयटे
या अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात पुणे येथे भारतातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा अर्बनचे संस्थापक चेअरमन मा. राधेश्यामजी चांडक, कर्नाटकातील सर्वात मोठ्या पतसंस्थांपैकी एक असलेल्या बीरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन श्री. अण्णासाहेब जोले आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत चारही राज्यांतील पतसंस्थांसमोरील विविध समस्या, सहकार क्षेत्रापुढील आव्हाने आणि पतसंस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पतसंस्थांचे प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडणे, सहकार क्षेत्रासाठी अनुकूल धोरणात्मक निर्णयांना चालना देणे आणि विविध राज्यांतील पतसंस्थांमध्ये परस्पर समन्वय व सहकार्य वाढविणे, यावर विशेष भर देण्यात आला.

देशाच्या आर्थिक विकासात पतसंस्था महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्या अडचणींचे निराकरण आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित अधिवेशन पतसंस्था चळवळीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.



