निसर्गरम्य वातावरणात सहकारी पतसंस्था प्रतिनिधींच्या बैठका उत्साहात संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

तळ्याची वाडी येथे संपन्न झालेल्या बैठकीचे छायाचित्र
निसर्गरम्य वातावरणात सहकारी पतसंस्था प्रतिनिधींच्या बैठका उत्साहात संपन्न

अहिल्यानगर : जिल्ह्यातील अकोले येथील भंडारदरा तसेच नाशिक जिल्ह्यातील तळ्याची वाडी येथे नाशिक विभागीय जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका निसर्गरम्य वातावरणात उत्साहात संपन्न झाल्या. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
भंडारदरा येथे संपन्न झालेल्या बैठकीचे छायाचित्र
या बैठकींना मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, धुळे जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा, जळगाव जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत भास्करराव साळुंखे, नंदुरबार जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष समीर जैन, गोविंदप्रसाद अग्रवाल आदींसह मोजकेच निमंत्रित केलेले सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहकारी पतसंस्था प्रतिनिधींच्या उपस्थित झालेल्या या बैठकीतून पतसंस्थांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पतसंस्थांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ या संकल्पनेनुसार विविध आपत्तींवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच ‘सहकारांतर्गत सहकार’ या संकल्पनेच्या माध्यमातून सहकार क्षेत्र अधिक सक्षम व व्यापक करण्यासाठी उपस्थित प्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली.

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ अधिक बळकट व सुदृढ करण्याच्या दृष्टीने हे निर्णय अतिशय हितावह ठरणार असल्याचे या बैठकीचे आयोजक नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा व अहिल्यानगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष शिवाजी आप्पा कपाळे यांनी सांगितले.
सहकारी पतसंस्थांच्या हितासाठी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन स्थापन करण्याच्या दृष्टीनेही बैठकीत चर्चा करण्यात आली. या उपक्रमाची जबाबदारी राज्य फेडरेशनचे संचालक धनंजय तांबेकर, सौ. अंजली पाटील आणि अभिनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली.

भंडारदरा येथील बैठकीचे सुत्रसंचालन बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र कानडे यांनी केले तर तळ्याची वाडी त्रंबकेश्वर येथील बैठकीचे नियोजन नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी केले होते.



