मी पाहिलेले कोल्हे साहेब….
पांढरे शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र ३६ इंची डगला व पांढरी शुभ्र टोपी घातलेले साहेब मी पाहिलेले आहेत….
तसेच पांढरा डगला काढून मोठमोठ्या हॉटेल, प्रवास, अॅम्बेसडर मध्ये कोपरीवर बसलेले साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
कोपरगावहून अहमदनगर, पुणे किंवा साताऱ्याला जाताना विळद घाटातील एका छोट्याशा हॉटेलात हमखास जेवण करणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
मुंबईला जाताना नाशिकला इनायत कॅफे किंवा शहापूरच्या पुढे पालवी हॉटेल मध्ये हमखास जेवायला थांबणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
संजीवनी कारखान्याच्या गेस्ट हाऊस वर हातात चाकू व चमचा घेऊन स्वतः कोरपड कापणारे व चॉकलेट सारखी कोरपड खाणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
संजीवनी गेस्ट हाऊस वर भोपळ्याची किंवा दोडक्याची भाजी व चटणी वर तेल टाकून भाजी-भाकरी व चटणी-भाकरी खाणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
कार्यकर्त्यांना फाड-फाड बोलणारे, एवढेच नव्हे तर नितीनदादा व बिपिनदादांना देखील चार चौघात खडे बोल सुनावणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
तसेच सर्वांवरच खूप प्रेम करणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
कार्यकर्त्यांना संकटात धीर देणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
करंगळी व शेजारच्या बोटात फोरस्क्वेअर सिगारेट धरून दर १० मिनिटाला सिगारेट पिणारे चेन स्मोकर साहेब मी पाहिलेले आहेत.. अन सिगारेट सोडल्यावर तिला स्पर्शही न करणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता येसगावचे १ व २ नंबरचे तळे होण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन विकत मिळावी म्हणुन भांडणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
कोपरगावच्या महापुराच्या व आगीच्या प्रसंगी मदतीला धावून येणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
कोपरगावच्या झोपडपट्टीतील घाण साफ करणारे साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
कोपरगाव नगरपालिकेचे उत्पन्न, जकातीचे दर कमी करूनसुद्धा अधिक उत्पन्न मिळवून देणारे दि मॅनेजमेंट गुरु ज़ साहेब देखील मी पाहिलेले आहेत….
प्रत्येक निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी होणारे व विजयाचा अहंकार न बाळगणारे साहेब देखील बघितले आहेत….
तसेच १९८६ साली विधान सभेचे तिकीट न मिळाल्याने आपल्याच सहकाऱ्याला मान.दादा पाटील रोहमारे यांना तिकीट मिळवून देऊन निवडून आणणारे साहेब देखील मी बघितले आहेत….
विधान परिषदेच्या निवडणुकीत केवळ १ मताने पराभव होऊन देखील न डगमगणारे साहेबही मी बघितले आहेत….