समता पतसंस्था व सुधन गोल्ड लोनचे मार्गदर्शन ठरले महा प्रशिक्षणाचे आकर्षण
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


समता पतसंस्था व सुधन गोल्ड लोनचे मार्गदर्शन ठरले महा प्रशिक्षणाचे आकर्षण
नागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय महा प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारी २०२६ ते ०१ मार्च २०२६ या कालावधीत नागपूर येथील संताजी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होत आहे.
२८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या महा प्रशिक्षण सोहळ्यात विशेषतः समता नागरी सहकारी पतसंस्था व सुधन गोल्ड लोन प्रा. लि. यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सुधन गोल्ड लोन प्रा. लि. चे संचालक संदीप कोयटे यांनी जगात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोने तारण कर्ज वितरण व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सुधन गोल्ड लोनच्या पारदर्शक कार्यपद्धती, जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहकाभिमुख सेवा यांचा आढावा घेत नागपूर विभागातील पतसंस्थांना या क्षेत्रातील संधी व जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या.
पहिल्या सत्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भट्टड यांनी “यशोगाथा आदर्श पतसंस्थांची” या विषयावर मार्गदर्शन करत समता पतसंस्थेची यशस्वी कार्यपद्धती, शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर आणि सभासद केंद्रित धोरणे यांची माहिती दिली. त्यांच्या सादरीकरणातून समता पतसंस्थेचा विकास प्रवास आणि स्थिर प्रगतीचे मॉडेल उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्याच्या शासकीय नियमक मंडळाचे सनदी लेखापाल श्रीकांत दुबे यांनी सहकारी क्षेत्रातील शासकीय नियम, लेखापरीक्षण प्रक्रिया व पारदर्शकतेचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या महा प्रशिक्षण कार्यशाळेस नागपूर जिल्ह्यासह नागपूर विभागातील एकूण १६८ पतसंस्थांचे ४२३ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समता पतसंस्था व सुधन गोल्ड लोन यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यशाळेला व्यावहारिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले असून, नागपूर विभागातील सहकारी पतसंस्थांसाठी ही कार्यशाळा दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

