काका कोयटे यांनी मुस्लिम समाजातील पतसंस्थांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करावे – श्री.अर्शद अजमल, सी.ओ.ओ.
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
काका कोयटे यांनी मुस्लिम समाजातील पतसंस्थांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करावे – श्री.अर्शद अजमल, सी.ओ.ओ.
कोपरगाव : सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळ ही काकांच्या नेतृत्वाखाली मजबूत स्थितीत काम करत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली समता पतसंस्था देखील आर्थिक दृष्ट्या भक्कम स्थितीत उभी आहे. त्यांनी मुस्लिम समाजातील पतसंस्थांच्या आर्थिक प्रगतीसाठी ही विशेष प्रयत्न करावेत.असे प्रतिपादन दिल्ली येथील सहुलत मायक्रो फायनान्सचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर (सी.ओ.ओ.) श्री.अर्शद अजमल यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास १० फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली येथील सहुलत मायक्रो फायनान्सचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर (सी.ओ.ओ.) श्री.अर्शद अजमल, डेप्युटी चिफ ऑफिसर (डी.सी.ओ.) श्री.उसामा खान आणि अंबाजोगाई येथील अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. उमर फारूक शेख, संचालक श्री.रिजवान शेख आदींनी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ कुरेशी यांनी केले तर सत्कार काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
तर समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, सहकारातील पतसंस्था चळवळीत मुस्लिम समाजातील समाज बांधवांनी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी पतसंस्था उभारून प्रगती करत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथील सहुलत मायक्रो फायनान्स आणि अंबाजोगाई येथील अलखैर नागरी सहकारी पतसंस्था.या दोन संस्थांच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील युवकांना इंटरेस्ट फ्री पद्धतीने कर्ज वाटपाचे काम करून कर्ज पुरवठा करत आहे. ही प्रशंसनीय बाब आहे.
तसेच पतसंस्था चळवळीतील मुस्लिम समाजातील तरुणांच्या पतसंस्थांसाठी शिर्डी येथील पिंपळवाडी रोड लगत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण व संशोधन केंद्रात भव्य मेळाव्याचे आयोजन करूया.अशी घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सहुलत मायक्रो फायनान्सचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर (सी.ओ.ओ.) श्री.अर्शद अजमल, अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. उमर शेख यांनी संयुक्तपणे केली.
समता पतसंस्थेचे कामकाज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी अधिक माहिती ठेव प्रमुख श्री.संजय पारखे यांनी दिली आणि सहकार उद्योग मंदिराविषयी अधिक माहिती समता महिला बचत गटाच्या महिलांनी दिली. मिळालेल्या माहितीबद्दल आभार व्यक्त करताना अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. उमर शेख म्हणाले की, मुस्लिम समाजात व्याज देणे आणि घेणे निषिद्ध मानले जाते,परंतु दिल्ली येथे सहुलत मायक्रो फायनान्स आणि महाराष्ट्रात अलखैर पतसंस्थेने मुस्लिम समाजा पुढे बिनव्याजी कर्ज देऊन आदर्श निर्माण केला आहे. तो आदर्श घेत मुस्लिम समाजातील तरुणांनी पतसंस्था चळवळीत येऊन पतसंस्था चळवळ अधिक भक्कम करावी.असे आवाहन केले. तर उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांनी मानले.